मुख्य पान  »  बीड विशेष  »  पुरूषोत्तमपुरीतील पुरातन अवशेष संशोधनाच्या प्रतिक्षेत !

पुरूषोत्तमपुरीतील पुरातन अवशेष संशोधनाच्या प्रतिक्षेत !

Updated at : 03/02/2013 21 : 17

बीड । (अशोक दोडताले)
माजलगांव तालुक्यातील श्रीक्षेत्र पुरूषोत्तमपुरी येथील गोदावरीच्या पात्रात दोन महिन्यापूर्वी उध्वस्त मंदिराचे पुरातन अवशेष सापडले असून, ग्रामस्थांनी हे अवशेष भगवान पुरूषोत्तमाच्या मंदिरासमोर आणून ठेवले आहेत. पुरातत्व खात्यातील संशोधकांच्या प्रतिक्षेत हे अवशेष धूळखात पडून आहेत.
माजलगांव पासून २२ कि.मी.अंतरावर असणा-या पुरूषोत्तमपूरी येथे भगवान पुरूषोत्तमाचे भारतातील एकमेव मंदिर आहे. या मंदिराच्या स्थापत्य कलेतील वैशिष्ट्य म्हणजे बांधकामास वापरलेल्या विटा चक्क पाण्यावर तरंगतात. यादवांचा मंत्री पुरूषोत्तमाने इस.सन १३१० मध्ये या मंदिराची उभारणी केली. यामुळेच या गावास पुरूषोत्तमपुरी हे नाव पडले मंदिरातील मुख्य देवताही याच नावाने ओळखली जाते. यादवांचा अखेरचा ज्ञात सम्राट येथेच सापडला उपलब्ध सर्व ताम्रपटातील हे ताम्रपट वजन व आकाराने मोठा मानला जातो भगवान पुरूषोत्तमाचे मंदिर गोदावरी नदीच्या पोटावर वसलेलं आहे. सध्याच्या तीव्र दुष्काळामुळे गोदावरीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. कोरड्या पडलेल्या या पात्रात ग्रामस्थांना दोन महिन्यांपूर्वी काही पूरातन अवशेष सापडले. त्यात स्तंभशीर्ष, स्तंभस्थळ, जांघा भागेवरील कोरीव दगडे व मंदिराच्या तळाशी विविध घडीव शिळांच्या समावेश आहे याच अवशेषात एक सतीची शिळा असून, ती साडेतीन फूट उंच व दोन फूट रुंद आहे. या शिळेवर एक हात दंडापासून कोरला असून तो आशिवंचनावस्थेत आहे. याच शिळेवर एकूण तीन शिल्पे कोरलेली आहेत.
ग्रामस्थांनी हा पुरातन वारसा भगवान पुरूषोत्तमाच्या मंदिरासमोर आणूण ठेवला आहे. नदी पात्रात एक प्राचीन घाट ही उघडा पडला असून सदर घाट यादवांच्याही पुर्वी बांधण्यात आला असवा असा अंदाज जिल्ह्यातील इतिहास संशोधक डॉ. सतीश साळूंके यांनी पुरूषोत्तमपुरी येथे भेट देऊन पाहणी केल्यानंतर केला. दोन महिन्यांपूर्वी सापडलेल्या अवशेष नेमके कशाचे? हे जाणून घेण्याविषयी ग्रामस्थ उत्सुक असताना पुरातत्व खात्यास मात्र अद्याप पुरूषोत्तमपुरी येथे भेट देण्यास वेळ मिळालेला नाही. या पुरातन वारसास्थळाचे संशोधन व्हावे अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

फोटो गॅलरी

५
४
३
२
१
४